
अमळनेर – तालुक्यात ऑगस्ट महिना अर्धा संपला तरी आवश्यक प्रमाणात पाऊस न झाल्याने खरीप हंगामच वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच लंपी आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केल्याने पशुपालक शेतकरी चिंतेत पडले आहेत.
१० ऑगस्ट रोजी तालुक्यातील मारवड येथील पशुपालक रविंद्र वामन पाटील यांच्या मालकीच्या गर्भार असलेल्या गायीचा लंपी आजाराने मृत्यू झाला. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश वाठोरे यांनी पंचनामा करून अहवाल जळगाव येथे पाठवला असल्याचेही सांगण्यात आले. तालुक्यात आतापर्यंत चार जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला असून आधीच पावसाच्या अभावामुळे शेतीच्या उत्पन्नात घट होणार त्यात लंपीने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने या पशुपालक शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे.




