
अमळनेर:- तालुक्यातील तापी व पांझरा नदीच्या संगमस्थळी ऋषीपंचमी निमित्त शाही स्नानासाठी जळगाव धुळे नंदुरबारसह संपूर्ण खान्देशातुन महिला भाविकांची अलोट गर्दी होऊन पहाटे पाच वाजेपासून सायंकाळ पर्यत हजारो महिलांनी शाही स्नान करून पुरातन कालीन “श्रीक्षेत्र कपिलेश्वर” त्रिपीडी महादेवाचे दर्शन घेतले , नदीपात्रात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने मंदिर संस्थानकडून महिला स्वयंसेवक तैनात केले होते.यावेळी पार्थिव शिवलिंग पूजन , ऋषी पूजन ,तापी आरती व महामंडलेश्र्वर हंसानंद महाराज यांनी ऋषींपंचमी माहात्म्यामावर प्रवचन केले. कार्यक्रमाची दिवसभर रेलचेल दिसून आली ,महिला भाविकांच्या अलोट गर्दीमुळे निम ते श्रीक्षेत्र कपिलेश्वर दरम्यान दोन किलोमीटर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या होत्या.
श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर हे खान्देशातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. दि. 28 ऑगस्ट रोजी ऋषिपंचमीच्या निमित्त तापी पांझरा संगमस्थळी जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्य़ातील जवळपास पंधरा हजार महिला भाविकांनी स्नान व तापी पुजन करून महादेवाच्या त्रिपीडी शिवलिंगांचे मंदिरावर दर्शन घेऊन महामंडलेश्र्वर हंसानंद महाराज यांचे ऋषीपंचमी निमित्त आयोजित प्रवचनाचा लाभ घेतला. ऋषिपंचमीला संगमस्थळी अशा पावित्र्य तीर्थस्थानावर स्नान केल्याने, दुख पीडा दूर होऊन संकट नष्ठ होत असल्याची महिमा असल्याने खान्देशाच्या कानाकोपर्यातून महिला भाविकांची गर्दी झाली होती.आचार्य महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांनी दुपारी बारा ते दोन वाज़े दरम्यान ऋषिपंचमी या महात्म्यामावर प्रवचन केले.नंतर महिलांनी पुजेला सुरुवात केली. श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.मंदिरावर पुजेच्या साहित्याची निम, मुडावद , अमळनेर येथील दुकाने थाटली होती.
मंदिराचे अध्यक्ष विश्वस्त श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट मुडावद निम (तापी पांझरा संगम)व समस्त भक्त परिवार यांनी बाहेर गावाहुन येणाऱ्या भाविकांसाठी निवास व प्रवचन एकण्यास मंडप टाकून बसण्याची व विसाव्याची सोय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
कपिलेश्र्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष हंसानंदजी महाराज, महेश महाराज, सचिव मगन पाटील ,विश्वस्त तुकाराम चौधरी ,सी एस पाटील, मंगेश पाटील, छोटू पाटील, सुदाम पाटील, राजेंद्र महाजन, राजेंद्र पवार आदींनी महिलांच्या नदीपात्रात स्नानासाठी विशेष काळजी म्हणून महिला स्वयंसेवकांकडून डोहात न उतरता काठावरच स्नान करण्याचा सुचना ध्वनिक्षेपकावर वारंवार केल्या गेल्याने मदतनीसांची मदत मिळाली. मात्र मंदिरा पर्यंत जाणारी बस सेवा अमळनेर आगारातून बंद झाल्याने अनेक महिला भाविकांना नीम येथुन दिंडी प्रवास करत कपिलेश्र्वर मंदिरा पर्यत आल्या तर खाजगी वाहनचालकांनी थेट अमळनेर व कळमसरे- नीम येथुन प्रवासी महिलांना मंदिरापर्यंत सोडण्याचे सहकार्य केले. खाजगी वाहनांची संख्या मोठी असल्याने जवळपास दोन किलोमीटरवर लांबलचक रांगा लागल्या होत्या.
मारवड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील पोलीस कर्मचारी व महिला पोलिसांनी वाहनचालक व महिलांना सुरक्षितता म्हणून सहकार्य केले.




