
टेंडर न काढता कचरा संकलनाच्या ठेकेदाराला मिळतेय दरवर्षी मुदतवाढ, ठेकेदार कोणाचा लाडका ?
अमळनेर:- शहरातील कचरा संकलनासाठी अवघ्या १८ घंट्यागाड्या आणि ६० कर्मचारी आहेत. त्यातही काही घंटागाड्या गॅरेजला लावल्या आहेत. तर काही धुळखात पडल्या आहेत. त्यामुळे शहरात कचराकोंडी निर्माण झाली असून नाशिकचा ठेकेदार बिले काढून नुसता मलिदा खात असल्याचा आरोप होत आहे. जनतेच्या पैशाचा हा एकप्रकारे अपहारच असून ठेकेदारावर आणि त्याला पोसणाऱ्या यंत्रणेवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.
अमळनेर शहरातील कचरा संकलनाचा ठेका हा नाशिक येथील नाशिक येथील मे. एस.आर. ग्रीनवे एम्पायर कंपनीला देण्यात आला आहे. कोरोनापासून एकच ठेकेदारा परस्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ठेका घेत आहे. टेंडर न होताच हा ठेका दिला जात असल्याने यात मोठी मिलीभगत असल्याचे बोलले जात आहे. तर कमी घंटा गाड्या आणि मनुष्यबळ कमी असल्याने कचरा संकलनात मोठी कसरत होताहे. यामुळे शहरात पुन्हा एकदा कचराकोंडी झाली आहे. शहरात १०० हून अधिक उघड्या कचऱ्याचे हाॅट स्पॉट ठरले आहेत. तर ठेकेदार कचरा संकलनात आणि पालिका त्यांच्याकडून काम करून घेण्यात सपशेल अपयशी ठरत आहे. तसेच पालिका ठेकेदाराचे लाड का करते, असा सवाल केला जात आहे.
घरातच साचतोय कचरा
शहरातील काही प्रभागात वेळेवर घंटागाडी येत नसल्यामुळे नागरिकांना घरातच कचरा ठेवावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे लगेच दुर्गंधी सुटू लागल्याने अखेर नागरिकांना हा कचरा रस्त्यावर आणून टाकावा लागतो. त्यामुळे शहरातील विशेषत: नवीन विकसित भागात रस्त्यावर आणि चौकातही कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. तसेच पावसाळ्यात डासांच्या उत्पत्तीला पोषक असे वातावरण तयार झाल्यामुळे शहरात साथीच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ठेकदाराचे कोण पुरवतय लाड ?
शहरातील कचरा संकलनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदाराचा कालावधी संपून अनेक वर्ष होऊन देखील पालिका प्रशासनाकडून नव्याने ई-निविदा प्रक्रिया न करता जुन्याच ठेकेदाराला पुन्हा-पुन्हा मुदतवाढ देत असल्यामुळे हा ठेकेदार कोणा- कोणाचा किती लाडका असेल याची कल्पना शहरवासीयांना यावी. शहरातील कचरा उचलण्यासाठी दर महिन्याला लाखो रुपयाची रक्कम मोजली जात असेल तर शहर चकाचक स्वच्छ पाहिजे. मात्र या विषयावर लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक कुणीही ‘ब्र’ शब्द का बोलत नाही. हा देखील संशोधनाच्या विषय आहे.
घंटा गाड्यांचा हालत नाही घंटा
काही घंटा गाड्या धुळखात पडल्या आहेत. काही गॅरेजमध्ये लावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील चालकांना घरीबसल्या पगार दिला जातोय का ? कोणत्या गॅरेजला या गाड्या लावल्या आहे ? किती नादुरुस्त आहेत, याची जबबादारी कुणाची आहे. याचे आॅडीट होऊन ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी होत असून नाशिकचा ठेकेदार असल्याने तो अमळनेरात किती लक्ष देईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया…
कचरा संकलन ठेक्याची मुदतवाढ लवकरच संपत असून पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. ठेक्यासंदर्भात इ टेंडरिंग प्रक्रिया सुरू असून काही दिवसात टेंडर फ्लॅश केले जातील.
– तुषार नेरकर, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद




