
प्रसिद्ध बिल्डर प्रशांत निकम यांचा आदर्श उपक्रम,परिस्थिती असतानाही निरर्थक खर्चाला दिला फाटा,
अमळनेर-परिस्थिती सदन असतांना,कार्यकर्त्यांची कमी नसतांना अमळनेर येथील सुप्रसिद्ध बिल्डर प्रशांत निकम यांनी घरीच आपल्या हस्ते शाडू मातीची सुबक पर्यावरणपूरक बनवून त्याचे विसर्जन देखील घरातच मोठ्या टपामध्ये पर्यावरण पूरक पद्धतीने केल्याने त्यांचा हा उपक्रम अमळनेरकरांसाठी आदर्श ठरला आहे.
विशेष म्हणजे विसर्जन प्रसंगी त्यांनी सर्व जाती धर्मांसह मुस्लिम समाज बांधवाना देखील सहभागी केल्याने सामाजिक एकतेचे प्रतिक त्यांचा गणेशोत्सव ठरला आहे.प्रशांत निकम हे अमळनेर येथील बिल्डर असून त्यांचे संपुर्ण कुटुंब सामाजिक विचारसरणीचे आहे.अमळनेर शहरात आदित्य बिल्डर च्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या वास्तू त्यांनी उभ्या केल्या आहेत. आपण मोठ्या इमारती निर्माण करू शकतो मग ज्यांना आपण परमेश्वर मानतो ती गणेश मूर्ती का नाही करू शकत?असा विचार त्यांच्या मनात आल्याने त्यांनी आपल्या व्यस्त कामातून 7 दिवसात दोन ते तीन तास वेळ काढत घरीच शाडू मातीची सुबक मूर्ती बनवली.यासाठी पत्नी सह कुटुंबियांचेही सहकार्य त्यांना लाभले. मूर्ती तयार झाल्यानंतर विधिवत स्थापना होऊन दररोज 11 दिवस भक्ती भावाने पूजाअर्चा,आरती व धार्मिक कार्यक्रम पार पडले.यात शेजाऱ्यांसह गावातील हितचिंतकही सहभागी झाले.अनंत चतुर्दशीला मुस्लिम बांधवासह सर्व जाती धर्माच्या स्नेहीना निमंत्रित करून पारंपरिक वाद्य लावत गल्लीतच छोटेखानी मिरवणूक काढली,यात गुलाल टाळून फुल पाकळ्या उधळण्यात आल्या.व शेवटी मिरवणूक घरी आल्यानंतर घरातील मोठ्या टपात भक्तिभावाने विसर्जन करून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. या पर्यावरणपूरक व सामाजिक एकतेचे प्रतिक असलेल्या गणेशोत्सवाचे यावेळी उपस्थित असलेल्या सौ वसुंधरा लांडगे,ऍड शकील काझी,हरी भिका वाणी, दिलीप जैन,एन.के.पाटिल, दिनकर पाटील,हिरामण कंखरे, अरुण देशमुख,रियाझ मौलाना,जमील मुजावर, रहीम शेख,ऍड रज्जाक शेख,जाकीर शेख,मंगलसिंग, भाग्यश्री वंजारी यासह इतर उपस्थितांनी तोंडभरून कौतुक केले.
देव पैशाने विकत घ्यायचा नसतो…
खरे पाहता देव पैशाने विकत घ्यायचा नसतो तर भक्ती भावाने स्वतः निर्माण करायचा असतो,घरी मुर्ती बनविता येत नसेल तरी भक्तिभावाने मातीचा गोळा जरी केला तर तोच आपला देव असतो हा भाव असणे महत्वाचे आहे .देव प्रत्येक माणसामध्ये,प्रत्येक जाती मध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये तो पहायचा असतो,कारण देवानेच बनविलेला हा निसर्ग असून त्याचे संगोपन करणे हे आपलेसर्वांचे कर्तव्य आहे.फार मोठा निरर्थक खर्च करूनच तो पावतो असे कुणाला वाटत असेल तर तो आपला भ्रम आहे.लाखो मुर्त्या पाण्यात विसर्जित केल्यानंतर आपण निसर्गच खराब करीत असून तशी परवानगी आपल्याला देवाने दिलेली नाही,आपला खारीचा वाटा म्हणून आपण निसर्ग वाचवू शकतो म्हणून मी घरीच पर्यावरणपूरक विसर्जन केले असून. शाडू मातीच्या मूर्तीने प्रत्येकाने पुढील वर्षी गणेशोत्सव अश्या प्रकारे साजरा करण्याचा प्रयत्न करावा.तसेच सर्व जाती धर्माना निमंत्रित करून आपण सारे एक आहोत हाच संदेश देण्याचा प्रयत्न मी केला आहे.
प्रशांत मनोहरराव निकम
अमळनेर




