
अमळनेर:- घरकुलाचे पैसे का टाकत नाही असे म्हणत चौघांनी चक्क महिला सरपंचासह तिघांना मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यातील सारबेटे बु. येथे घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २ रोजी सायंकाळी सदर महिला सरपंच घरी असता गावात राहणारे सरफराज खा शफीक खा, मोहसीन खा शफीक खा, फिरोज खा शफीक खा, व मोईन खा शफीक खा हे चौघे अंगणात येऊन शिवीगाळ करू लागले. याबाबत महिला सरपंचाने विचारणा केली असता चौघांनी सांगितले की, तू आमचे घरकुलाचे पैसे का टाकत नाही, त्यावेळी महिला सरपंचाने सदर पैसे मी टाकत नसून बिडीओ आणि इंजिनिअर टाकत असल्याचे सांगितले. मात्र महिला सरपंचाच्या बोलण्याचा त्यांना राग आल्याने चौघांनी तिला पुन्हा शिवीगाळ करत चापट बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. सदर महिलेला वाचवण्यासाठी आलेले भाऊ व भाचा यांना लोखंडी रॉड, वीट व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. त्यावेळी गावातील लोकांनी येऊन भांडण सोडवले. महिलेचे दोन्ही भाऊ व भाचा जास्त जखमी झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर महिलेच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ग्रे. पीएसआय रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत.




