
अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांची मिळालेली मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याबाबत दिले पत्र…
अमळनेर : तालुक्यातील सोनखेडी येथील एका शेतकऱ्याने अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांची मिळालेली मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करून घ्यावे असे पत्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला तहसीलदारच्या मार्फत दिले आहे.
सोनखेडी येथील प्रदीप किरण पाटील या शेतकऱ्याने निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या गट क्रमांक १९५/२ व १८९ या गटात माझी शेती आहे. शासनाने अतिवृष्टीमुळे मदत जाहीर केली आहे. मी अल्पभूधारक असल्याने माझ्या खात्यात अनुक्रमे ३ हजार ९०० व २ हजार ९०० इतकी जमा होणार आहे. ही रक्कम आमच्या उदरनिर्वाहाकरिता तुटपुंजी आहे. म्हणून ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात यावी. शासनाच्या जाहीर केलेल्या आश्वासनाप्रमाणे मला हेक्टरी १८ हजार रुपये मिळायला हवी. मात्र ती अतिशय तुटपुंजी आहे. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक केली आहे. कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर कित्येक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. एक वर्ष आम्ही दिवाळी साजरी केली तर मरणार नाहीत परंतु माझी तुटपुंजी रक्कम सरकार मधील मंत्र्यांना चांगल्या कामासाठी उपयोगी पडेल म्हणून मुख्यमंत्री निधीत जमा करून घ्यावी असे पत्र व्यथित झालेल्या प्रदीप पाटील यांनी निवासी नायब तहसीलदार सी यु पाटील यांना दिले आहे. आणि हेच पत्र आपले सरकार पोर्टल तसेच मुख्यमंत्र्यांना मेल द्वारे देखील पाठवण्यात आले आहे.




