
निवडणुकीचे वारे वाहू लागताच साहेबराव पाटलांच्या सुरू झाल्या वाऱ्या…
अमळनेर:- अमळनेर नगरपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागताच विधानसभेचे रणांगण सोडून पळणारे माजी आमदार साहेबराव पाटलांच्या पुन्हा अमळनेर वाऱ्या सुरू झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांच्या इच्छा आकांक्षा जागवून साहेबराव पाटील विद्रोहाची मशाल हाती घेतली होती. इतकी विकासकामे करून ही व उपमुख्यमंत्र्यांच्या इतक्या जवळ असून ही, स्वतःला मंत्रिपद मिळाले नाही मात्र कानामागून आली आणि तिखट झाली असा प्रकार त्यांच्या बाबतीत झाला होता. त्याबाबतची खंत अनेकदा त्यांनी जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली होती. त्यामुळे दुखावलेल्या अनेकांना सोबत घेत त्यांनी तुतारी फुंकण्याची तयारी दर्शवली. पलटी झालेला टांगा जोडत फरार झालेले इतर घोडे ही जमा झाले. मात्र टांग्यात बसणाराच घोड्यांना वाऱ्यावर सोडत स्वतःचा भाव वाढवून पळून गेला. साहेबराव पाटील यांची अशी कोणती नस दाबली की ज्यामुळे त्यांनी डायरेक्ट राजवड गाठले याचे कोडे अनेकांना पडले आहेच. मात्र उपमुख्यमंत्री आल्यावर ही अमळनेरात न येणारे साहेबराव पाटील आता नगरपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने पुन्हा शहरात फिरकू लागले आहेत. अनेक इच्छुकांच्या घरीदारी फिरत ते आपला जनसंपर्क दाखवत असले तरी जनतेच्या मनात असलेली पत, व स्वतःचे राजकीय भवितव्य त्यांनी पलटी मारून संपवली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी ही त्यांना गांभीर्याने घेणे सोडून दिले आहे. अन्य वेळी विजनवासात जाणारे मात्र निवडणुकीच्या तोंडावर झलक दाखविणारे साहेबराव दादा हे एका नेत्याने त्यांना दिलेली राजकीय सोंगाड्या ही पदवी मात्र सार्थ ठरवत आहेत हे नक्की…




