
अमळनेर : तालुक्यातील भोरटेक रेल्वे गेट परिसरातील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. रेल्वे फाटक असलेले वळण आणि तुटलेला रस्ता हे वाहनचालकांच्या जीवाशी खेळ करणारे ठरत आहे. नेमक्या वळणाच्या ठिकाणी रस्ता उसळून पडला असून, डांबराचे थर निघून गेले आहेत. इतकेच नव्हे तर रस्त्यातून लोखंडी सळई बाहेर आली आहे, जी वाहनाच्या टायरला फाटे पाडू शकते किंवा दुचाकीस्वारांचा तोल जाऊन थेट अपघात घडू शकतो.
या रस्त्यावरून अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा जाणारी अनेक वाहने दररोज प्रवास करतात. पुढे शहादा व आग्रा हायवेला जोडल्या जाणार रस्ता आहे. या रेल्वे फाटकाजवळील हा रस्ता अरुंद असून, एका बाजूला रेल्वेची कुंपणं आणि दुसऱ्या बाजूला तुटलेला रस्ता यामुळे वाहनचालकांसाठी परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. दोनचाकी वाहनचालकांना सळई व खड्डे टाळताना गाडीचा तोल सावरणे कठीण होत आहे. रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर वाहनांची रांग लागते, आणि गेट उघडल्यानंतर सर्वजण एकाच वेळी पुढे सरकतात. त्या वेळी या वळणावर अपघात होण्याची शक्यता अत्यंत जास्त असते. सळई आणि खड्डे नजरेस न आल्याने अनेकवेळा वाहनचालक थोडक्यात वाचल्याचे स्थानिकांनी सांगितले. भोरटेक रेल्वे गेटजवळील वळणाच्या ठिकाणी रस्ता तात्काळ दुरुस्त करून बाहेर आलेली लोखंडी सळई काढून टाकावी, तसेच येथे योग्य प्रकाशयोजना आणि इशारा फलक लावावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.




