
अमळनेर : शहरातील अमलेश्वर नगर भागात घाण आणि दुर्गंधीयुक्त पिण्याचे पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या समस्या येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
तापी नदीत पुरेसा पाणी साठा असताना देखील शहरात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. अमलेश्वर नगर भागात कधी सात दिवसाआड ,पाच दिवसाआड तर कधी दहा दिवसाआड पाणीपुरवठा आणि तोही कोणत्याही वेळी पहाटे , संध्याकाळी ,दुपारी होत असतो. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो. पिण्याच्या पाण्याची वाट पाहत बाहेरची कामे देखील करता येत नाहीत किंवा नातेवाईकांच्या लग्न, कार्यक्रमाला जाता येत नाही.
२९ रोजी अमलेश्वर नगर भागात अत्यंत दूषित पाणी पुरवठा झाला. पाणी मळकट होते. त्याला पांढऱ्या रंगाचा फेस येत होता आणि दुर्गंधी देखील येत होती. अनेक नागरिकांनी आधीच्या साठवलेल्या पाण्यात हे पाणी टाकल्याने तेही पाणी फेकून द्यावे लागले. यापूर्वी देखील हीच समस्या या प्रभागात अनेक दिवस सतावत होती. खोदकामामुळे पाईप लाईन फुटली होती त्यामुळे गढूळ पाणी यायचे. दुरुस्ती केल्यानन्तर काही दिवस शुद्ध पाणी पुरवठा झाला आणि नन्तर पुन्हा दुर्गंधीयुक्त पाणी यायला लागले आहे. नागरिकांनी नियमित आणि शुद्ध पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी केली आहे.




