
नोंदणीच्या तुलनेत खरेदी अत्यल्प दुसरे केंद्र सुरू करण्याची मागणी
अमळनेर : कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्रासंदर्भातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी दिनांक ३ रोजी बाजार समिती कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. सभेत सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू असले तरी नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या तुलनेत प्रत्यक्ष खरेदी अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
सध्या सदर केंद्रावर आठवड्याला केवळ सुमारे २०० शेतकऱ्यांना स्लॉट उपलब्ध होत असून, नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या सुमारे ८ हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून तातडीने दुसरे सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी संचालकांनी केली.
सभेत कापसाच्या दर्जासंदर्भातही गंभीर आक्षेप नोंदवण्यात आला. सीसीआयने ठरवून दिलेल्या निकषांनुसार कापूस दर्जा कमी असल्याचे कारण देत ग्रेडरकडून कापूस नाकारला जातो मात्र तोच कापूस माल कट्टी कापून दिल्यानंतर स्वीकारला जात असल्याचे प्रकार घडत असून हे नियमबाह्य असल्याचे सभेत नमूद करण्यात आले. तसेच खान्देश विभागात उत्पादित होणाऱ्या कापसाच्या वैशिष्ट्यांचा विचार करून नवीन दर्जा निकष ठरविण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली, जेणेकरून शेतकऱ्यांना आपला कापूस हमीभावाने विकता येईल.
स्लॉट बुकिंगसाठी शेतकऱ्यांना वारंवार बाजार समिती कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असल्याने किमान एक महिन्याचे स्लॉट एकाच वेळी खुले करण्यात यावेत, यासाठी बाजार समिती प्रयत्नशील राहील, असे सभेत स्पष्ट करण्यात आले. तसेच नवीन सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीही बाजार समिती प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सभेस सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील यांच्यासह संचालक अशोक पाटील, सुभाष पाटील, भोजमल पाटील, प्रफुल्ल पवार, हिरालाल पाटील, सचिन पाटील, नितीन पाटील, भाईदास अहिरे, शरद पाटील, वृषभ पारख, प्रकाश वाणी आदी उपस्थित होते




