
बेकायदेशीरपणे घर पाडणाऱ्यांना आणि गुंडगिरी करणाऱ्यांना बसला मोठा चाप
अमळनेर (प्रतिनिधी) येथील दिवाणी न्यायालयाने ‘न्यू प्लॉट’ मधील जागेप्रकरणी महत्त्वाचा आदेश दिला आहे. वादी शरद शिंदे यांच्या ताब्यातील घरात अडथळा निर्माण करण्यास आणि त्यांना बेकायदेशीरपणे बाहेर काढण्यास न्यायालयाने प्रतिवादी महेश आणि इतरांना तात्पुरत्या मनाई हुकुमाद्वारे रोखले आहे. या निर्णयामुळे बेकायदेशीरपणे घर पाडणाऱ्यांना आणि गुंडगिरी करणाऱ्यांना मोठा चाप बसल्याचे मानले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ‘न्यू प्लॉट’ मधील शरद शिंदे (वादी) यांचे घर बिल्डर सरजू गोकलानीसह त्यांच्या माणसांनी बेकायदेशीरपने जेसीबीने पाडून त्यांचा संसार उघड्यावर आणला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिंदे यांनी न्यायालयाकडे धाव घेऊन दाद मागितली होती की, ते संबंधित मालमत्तेचे भाडेकरू असून तिथे वास्तव्यास आहेत. मात्र, प्रतिवादी महेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून कायद्याच्या प्रक्रियेचा अवलंब न करता, जबरदस्तीने घराचा ताबा घेण्याचा आणि घर पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यात न्यायालयाने शिंदेच्या वतीने सादर केलेले पुरावे, जसे की कराच्या पावत्या आणि वीज बिल, यांची दखल घेतली. या कागदपत्रांवरून प्रथमदर्शनी त्यांचा त्या जागेवर ताबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. जर या स्थितीत तातडीने मनाई हुकूम दिला नसता, तर वादींच्या हक्कांचे नुकसान झाले असते, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. अमळनेर येथील सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एन. आर. यलमाने यांनी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी हा आदेश पारित केला आहे. या निर्णयामुळे बेकायदेशीरपणे घर पाडणाऱ्यांना आणि गुंडगिरी करणाऱ्यांना मोठा चाप बसल्याचे मानले जात आहे. शिंदे यांच्याकडून ॲड. वाय. पी. पाटील व ऍड चेतना पाटील यांनी काम पहिले.
न्यायालयाने दिलेले आदेश
• तात्पुरता मनाई हुकूम: पुढील तारखेपर्यंत प्रतिवाद्यांनी वादींच्या ताब्यातील मालमत्तेत कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नये, असा ‘एकतर्फी तात्पुरता मनाई हुकूम’ न्यायालयाने जारी केला आहे.
• कारणे दाखवा नोटीस: हा मनाई हुकूम पुढे का सुरू ठेवू नये, याबाबात प्रतिवाद्यांना आपली बाजू मांडण्यासाठी ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे.




