
अमळनेर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ग्राहकाच्या मागील १२ महिन्यांच्या सरासरी वीज वापरावर आधारित सौर प्रकल्प क्षमतेवर निर्बंध लादल्याने पी एम सुर्यघर मोफत बिजली योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्राहकांवर बंधने घालून अन्याय केला जात असल्याचे निवेदन अमळनेर तालुका सोलर असोसिएशन ने दिले आहे.
देशभरात ग्राहकाने स्वतःसाठी एक पासून पुढे कितीही किलो वॅट विद्युत भार मंजूर करून त्या क्षमतेचे सोलर मंजूर करू शकतात. मात्र महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने आता राज्यातील ग्राहकांना मागील १२ महिन्यांची सरासरी पाहून विद्युत भार मंजूर करून त्या प्रमाणात सोलर मंजूर करीत असल्याने उन्हाळ्यात ग्राहकांचा वापर वाढल्यास त्यांना जादाचे वीज बिल भरावे लागणार आहे. ग्राहकांना आता विद्युत भार अपडेट करता येणार नाही. सौर प्रकल्प बसवणे हे केवळ वीज बचतीसाठी नसून स्वच्छ व शाश्वत जीवनशैलीकडे संक्रमणासाठी पाऊल आहे.त्यामुळे १२महिन्यांच्या सरासरी वीज वापराचे बंधन हरित उर्जेच्या उद्दिष्टविरोधी आहे. सौर प्रकल्पात स्वातंत्र्य असल्यानेच नागरिक गॅस ऐवजी इलेक्ट्रिक शेगडी , इंधन ऐवजी इलेक्ट्रिक वाहने ,इंडक्शन कुकिंग साधने वापरत आहेत. जर ग्राहकांवर मर्यादा आली तर ते इंधन जाळण्यावर भर देतील.
वितरण कंपनी तोटा होत असल्याचा दावा करीत आहे मात्र वितरण कंपनी ग्राहकाला ९ रुपये पासून तर १९.५० रुपयांपर्यंत दर आकारते आणि उलट पक्षी ग्राहकांकडून निर्यात होणाऱ्या अतिरिक्त विजेसाठी वितरण कंपनी २.९० रुपये प्रति युनिट मोबदला देते. स्थानिक पातळीवरच विद्युत निर्माण होत असल्याने दूरवरच्या औष्णिक प्रकल्पातून वीज आणताना होणारा तोटा वाचतो. आणि फक्त महाराष्ट्रात ग्राहकांना मर्यादा घालून देण्यात आली असल्याने एक प्रकारे अन्याय आहे त्यामुळे विद्युत भार वाढवण्याच्या सवलतीला बंद करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे , आमदार अनिल पाटील ,खासदार स्मिता वाघ ,माजी आमदार शिरीष चौधरी याना देण्यात आले आहे. निवेदनावर अध्यक्ष प्रवीण शिंपी , उपाध्यक्ष निलेश वाघ , जनरल सेक्रेटरी मनोज पाटील , खजिनदार किसन पाटील , सागर पाटील , महेंद्र मकडीया ,उषा सोलर , सूर्या बॅटरी , सुदर्शन सोलर , शिरसाठ एंटर प्रायझेस , साई सोलर ,एस के सोलर ,पियुषा इंजिनियर्स ,एस पी सोलर ,शंभूराजे इलेक्ट्रिकल , युनिव्हर्सल सोलर ,शिव छत्रपती एंटर प्रायझेस ,सनहिल सोलर , एच आर सोलर ,सन बिंग आदींच्या सह्या आहेत.




