
अमळनेर:- येथील खासगी रुग्णवाहिका चालक आकाश पाटील हे रुग्णाला धुळे येथे सोडून आपल्या रुग्णवाहिकेसह अमळनेरकडे परतत होते. रात्रीच्या सुमारास चोपडी कोंडावळ आणि डांगर या दरम्यान त्यांना रस्त्याच्या कडेला एक हरीण रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेले दिसले. अज्ञात वाहनाच्या धडकेत हे हरीण गंभीर जखमी झाले होते.
रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या त्या मुक्या जीवाला पाहून आकाश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली रुग्णवाहिका थांबवली. जवळ जाऊन पाहिले असता, ती हरणी गर्भवती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने त्या हरणीला आपल्या रुग्णवाहिकेत टाकले आणि थेट अमळनेर येथील पशुवैद्यकीय दवाखाना गाठला.
पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांनी देखील तातडीने उपचार सुरू केले, ज्यामुळे हरणीचे आणि तिच्या पोटातील पिलाचे प्राण वाचण्यास मदत झाली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी देसले यांनी आकाश पाटील यांची भेट घेऊन त्यांचे विशेष कौतुक केले.




