
अमळनेर : मोटरसायकल स्लिप होऊन मोटरसायकलवर बसलेली महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी डांगर गावाजवळ घडली होती. महिलेचा उपचार घेताना मृत्यू झाल्याने अमळनेर पोलिसात उशिराने मोटरसायकल चालवणाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लताबाई बाळू बडगुजर (वय ४५ रा पिंपळकोठा बुद्रुक ता एरंडोल) ही महिला आणि धरणगाव येथील तेली तलाव जवळील राहणार पांडुरंग हरिनाथ महाजन हे तीर्थ यात्रेचे आयोजन करीत असत. तिर्थयात्रेचे पैसे घेण्यासाठी ते दोघे डबलशीट मोटरसायकल क्रमांक एम एच १९ बी डब्ल्यू ५५५६ ने धुळे व पिंपळनेर गेले होते. परत येताना डांगर गावाजवळ मोटरसायकल स्लिप झाल्याने दोघे मोटरसायकळवररून खाली पडले आणि लताबाई ला डोक्याला व हातापायाला जबर मार लागला होता तर पांडुरंग याला डोळ्याला व हातापायाला मार लागलेला होता. डांगर पोलीस पाटलाने त्यांना उपचारासाठी ओम हॉस्पिटल धुळे येथे रवाना केले होते. उपचार घेताना लताबाईचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर सदाकत सैय्यद यांनी घोषित केले. धुळे येथील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला त्याची नोंद करण्यात आली होती. सर्व धार्मिक विधी आटोपल्यावर लताबाई च्या पतीने पांडुरंग यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.




