
अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून अंबाऋषी टेकडीवरील दाट झाडी प्रेमी युगुलांचा अड्डा बनला आहे. दामिनी पथकाने धाड टाकून चार प्रेमी युगुलांना रंगेहाथ पकडल्याची घटना १० रोजी दुपारी घडली.

अमळनेर शहराबाहेर पूर्वेला नगरपरिषदेची पाणी पुरवठा योजना अंबाऋषी टेकडीवर आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी हजारो झाडे याठिकाणी लावल्याने पर्यावरण समृद्ध होऊन ऑक्सिजन पार्क तयार झाला आहे. मात्र या दाट झाडीचा गैरफायदा घेत अनेक प्रेमी युगुल दुपारच्यावेळी प्रेमचाळे करायला येत असतात. १० रोजी दुपारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , नम्रता जरे याना फोन वरून गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निकम यांनी आपले दामिनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे , नम्रता जरे , उज्वलकुमार म्हस्के , प्रशांत पाटील यांना कारवाईसाठी पाठवले. पथकाने गुपचूप जाऊन चारही बाजूने घेरून प्रेम चाळे करणाऱ्या चार तरुणी आणि चार तरुणांना रंगेहात पकडून पोलीस स्टेशनला आणले. पथकाने आपला पोलिसी खाक्या दाखवताच प्रेमी युगुलानी ते वडजाई ता धुळे, बिलाडी ता. धुळे ,वसंतनगर ता. पारोळा , सांगवी तांडा ता. चाळीसगाव , मोरफड मंगरूळ , पारोळा येथील असल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी त्यांना पोलिसांच्या भाषेत समज देऊन तरुण तरुणींच्या पालकांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.
शहराबाहेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत निर्जन स्थळी प्रेम चाळे करणाऱ्यांवर दामिनी पथकाची करडी नजर असून मुलींची छेडखानी करणाऱ्या तसेच इतर टवाळ पोरांवर देखील कठोर कारवाई करण्यात येईल.- दत्तात्रय निकम , पोलीस निरीक्षक अमळनेर




