
बोहरा येथील गरीब कुटुंब उघड्यावर, सुदैवाने जीवितहानी टळली…
अमळनेर : तालुक्यातील बोहरा येथे उपसा सिंचन योजनेच्या पाइपलाइनसाठी खोदण्यात येणाऱ्या चारीसाठी करण्यात येणाऱ्या स्फोटात एका गरीब कुटुंबाचे घर जमीनदोस्त होऊन संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडले आहे.

दिलीप बुधा भिल असे घरमालकाचे नाव असून सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाच्या उपसा सिंचनासाठी बोहरा गावाबाहेरून मुख्य पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोल चारी खोदावी लागत आहे. बऱ्याच ठिकाणी दगड लागत असल्याने जिलेटीन सारख्या स्फोटक पदार्थांचा वापर करून स्फोट करावे लागतात. १ रोजी दिलीप भिल यांच्या घरापासून काही अंतरावर स्फोट करण्यात आले. त्यामुळे त्यांचे अख्खे घरच कोसळले. यापूर्वीही अनेकदा घरांना भूकंपसारखे धक्के बसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घर जमीनदोस्त झाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले गावकऱ्यांनी त्यांना तात्पुरता आसरा दिला आहे. घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून कुटुंबाला संपूर्ण नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.




