अमळनेर:- तालुक्यातील मुंगसे येथील ३३ वर्षीय तरूणाचा शेतात बैलांसाठी चारा गवत कापत असताना विजेचे धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक २४ रोजी दुपारी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंगसे सावखेडा रस्त्यावर असलेल्या शेतात ज्ञानेश्वर बापू कोळी हा दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास गुरांसाठी चारा कापत असताना ट्युबवेलच्या उघड्या तारेशी संपर्क आल्याने विजेचा धक्का बसून तो बेशुद्ध झाला. त्याला पुढील उपचारासाठी चोपडा नेले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. रात्री शवविच्छेदन करून अंत्ययात्रा दि. २५ रोजी सोमवारी सकाळी ८ वाजता त्याच्या राहत्या घरून निघणार आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार बहीणी, आई वडील असा परिवार आहे. ते माजी सरपंच बापू संपत कोळी यांचा मुलगा होत. तरुणाचे आहे दुर्दैवी निधन झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे .