
मुंदडा नगर १ भागातील नागरिकांचा जीव धोक्यात, पालिका लक्ष देईल का ?
अमळनेर:- शहरातील मुंदडा १ नगर जवळील पाणी टाकी परिसरात नगरपरिषदेने साकारलेल्या कृषिपुष्प उद्यानात अतिशय मोठ्या प्रमाणात जंगल सदृश्य झाडे झुडपे वाढल्याने याठिकाणी अक्षरशः सर्पाचे राज निर्माण झाले असून यामुळे परिसरातील नागरिक व लहान बालकांचा जीव धोक्यात आला आहे.

माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या काळात हे उद्यान विकसित झाल्याने येथील नागरिकांनी त्यांच्या या योगदानाची आठवण कायम राहावी यासाठी कृषिपुष्प उद्यान असे नाव दिले आहे. त्यानंतर याठिकाणी वृक्षारोपण झाल्याने उद्यानात छान हिरवळ साकारली होती मात्र कालांतराने पालिका आणि परिसरातील नागरिक दोघांकडून हे उद्यान दुर्लक्षित झाल्याने याठिकाणी शोभेच्या झाडाऐवजी इतर झाडे झुडपेच जास्त वाढून परिणामी नागरिकांचे येथे येणेच बंद झाले. यामुळे सर्पाना हक्काची जागा मिळाली असून अनेकदा हे सर्प बाहेर पडून कधी रस्त्यावर तर कधी कुणाच्या घरात व वाड्यात घुसत आहेत.सुदैवाने आतापर्यंत काही विपरीत घटना घडली नसली तरी तशी घटना कधीही घडू शकते अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पालिकेने येथे मोठया प्रमाणात वाढलेली झाडेझुडपे काढून स्वच्छता मोहीम राबवावी,आणि राहिलेली इतर कामेही पूर्णत्वास आणावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.




