
प्रा.डॉ. सतीश पारधी व प्रा. किशोर पाटील यांचा झाला सन्मान…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील उपक्रमशील शिक्षक तथा महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. सतीश हरलाल पारधी व हिंदी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा.किशोर निंबा पाटील यांना भारत सरकारच्या नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या वतीने राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार देवून नुकतेच सन्मानित करण्यात आले.

या दोन्ही प्राध्यापक द्वईंनी महाविद्यालयात वेळोवेळी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न राहू देता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणत विविध सांस्कृतिक कार्यातही आपला ठसा उमटवलेला आहे. पुरस्कार बहालीनंतर आपले मनोगत व्यक्त करताना दोन्ही प्राध्यापक द्वईंना या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल भारत सरकारच्या नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे आभार मानले असून भविष्यात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक तथा विकासोन्मुख उपक्रम राबविण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या गुणतालिकेत वाढ करण्याबरोबरच त्यांना देशाचे सक्षम नागरिक बनविण्यात अधिकाधिक भर देणार असल्याचे सांगितले.
धुळे येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरणाच्या या दिमाखदार सोहळ्यात धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलाडे, सेनादलाचे कर्नल गणपती श्रीनिवासन, फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे, फोरमचे महाराष्ट्र सचिव ईश्वर पाटील, प्रमोद पाटील, तसेच फोरमचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, प्रमुख अतिथी अशोक पाटील, आयोजन समितीचे सदस्य भास्कर पाटील, प्रकाश पाटील यांच्या हस्ते दोन्ही प्राध्यापकांनी हा पुरस्कार सपत्नीक स्वीकारला. प्रा. डॉ. सतीश हरलाल पारधी व प्रा. किशोर निंबा पाटील यांना मिळालेले या आदर्श शिक्षक पुरस्कारानिमित्त ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष देविदास साळुंखे, संस्थेचे सचिव देविदास बारकू पाटील व सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंतराव देसले यांच्यासह प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




