
मद्यधुंद क्रेटाचालक जबर जखमी, बसचालकाने दिली मारवड पोलीसात तक्रार…
अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे गावाजवळ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या क्रेटा चालकाने एसटीला धडक दिली असून यात वाहनचालकाला मार लागला आहे. याप्रकरणी क्रेटा चालकाविरुद्ध मारवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बसचालक नितीन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी अमळनेर आगाराची एसटी बस शिरपूर कडे जात असताना सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास भिलाली फाट्याच्या जवळ बेटावदकडून येणाऱ्या क्रेटा वाहन क्रमांक एमएच १७ बीएम ५९९९ या गाडीचालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून बसच्या डाव्या बाजूला धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून क्रेटा चालकाला हातापायाला जबर दुखापत झाली आहे. तसेच बसचालक व प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यावरून मारवड पोलीसात क्रेटा चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.
क्रेटा चालक हा दारूच्या झिंगेत असल्याची माहिती…

जखमी क्रेटा चालक अंकुश घारे हा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रहिवासी असून सदर क्रेटा वाहनात दारूची बाटली आणि दारूचे ग्लास आढळून आले आहे. सदर चालक हा पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे अपघातस्थळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याला अमळनेर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यांनतर नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारासाठी इतरत्र नेल्याची माहिती आहे.




