गटशिक्षणाधिकारी यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन…
अमळनेर:- शिक्षणतज्ञ तथा नगर येथील सीताराम सारडा विद्यालयाचे प्राचार्य हेरंब कुलकर्णी व वाशिम जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक दिलीप सोनुने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. यात कुलकर्णी हे जखमी तर दिलीप सोनुने यांना तर पेट्रोल टाकून जाळले, यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गेल्या तीन दिवसात शिक्षकांवर जे प्राणघातक हल्ले झाले त्या दोन वेगवेगळ्या घटनांचा अमळनेर तालुका प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व संघटना तसेच शिक्षण प्रेमी यांच्याकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी शासनाने कडक कायदे करावेत, तसेच दोन्ही घटनेतील आरोपींना ताबडतोब अटक करून कडक कारवाई करावी. यासाठी अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी टिडीएफ संघटनेचे कार्याध्यक्ष उमेश काटे यांनी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी सांगितले की, झालेला प्रकार हा दुर्दैवी असून आपल्या भावना शासन दरबारी कळविल्या जातील असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रताप महाविद्यालयाचे माजी उपप्रचार्य डॉ एस. ओ. माळी, तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष डी.ए धनगर, तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे, शिवशाही फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे, खान्देश साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ कुणाल पवार, उपाध्यक्ष मनोहर नेरकर, साने गुरुजी शैक्षणिक विचार मंचचे दत्तात्रय सोनवणे, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे ईश्वर महाजन, गोपाल हडपे, विशाल देशमुख, शरद पाटील, अशोक पाटील, अशोक ईसे, सुनील जाधव, जे.डी अहिरे सह शिवशाही फाऊंडेशन, माजी प्रतापियन्स प्रबोधिनी, साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच, खान्देश साहित्य संघ व ओबीसी शिक्षक असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते.