
अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे कक्ष अधिकारी महेश जाधव यांनी दिले आदेश…
अमळनेर:- गौरी गणपती काळातील उरलेले ‛आनंदाचा शिधा संच’ दोन दिवसात वाटा आणि जो प्रथम येईल त्याला प्राधान्य द्या असे आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे कक्ष अधिकारी महेश जाधव यांनी दिले आहेत. अमळनेर तालुक्यात २३४५ संच शिल्लक आहेत.

शासनाने गौरी गणपती काळात १०० रुपयात आनंदाचा शिधा अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांना देण्याचे जाहीर केले होते. यात प्रत्येकी १ किलो रवा, चना डाळ, साखर, तेल आदी पदार्थांचा समावेश होता. अमळनेर तालुक्यात अंत्योदयचे ८ हजार ९३४ व प्राधान्य कुटुंबाचे ३९ हजार ९९७ असे एकूण ४८ हजार ९३१ संच प्राप्त झाले होते. मात्र सप्टेंबर महिना संपूनही २३४५ संच वाटप झालेले नाही. त्यात शासनाने नव्याने दिवाळी साठी जुन्या संचात अर्धा किलो पोहे आणि अर्धा किलो मैदा असे पदार्थ वाढवून आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र त्यासाठी आधीचा शिधा १०० टक्के वाटप झाला पाहिजे. परंतु अनेक लाभार्थी बाहेरगावी गेले असल्याने २ हजार ३४५ संच अद्यापही शिल्लक आहेत. लाभार्थ्यांचा अंगठा लागत असल्याने हा संच इतरांना देता येत नाही. शासनाने १० ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढवली होती. परंतु तरीही शिधा वाटप न झाल्याने अखेरीस शिल्लक माल खराब होऊ नये म्हणून इतर लाभार्थ्यांना वाटप करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासनाने नवीन आदेश काढून वंचित लाभार्थी त्यांनतर जो आधी मागणी करील त्याला हा शिधा वाटप करून शिल्लक माल संपवण्याचे आदेश दिले आहेत.




