लहान व्यावसायिकांना आर्थिक फटका,भीतीचे वातावरण…
अमळनेर:- येथील बस स्टॅण्ड समोरील भागवत रोडवर आठ दिवसात तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडून डल्ला मारला असून यामुळे हातावर पोट असणाऱ्या लहान व्यावसायिकांना आर्थिक फटका बसून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर चोरट्यांनी दिवाळीच्या काळातच हे चोरीचे सत्र चालविले आहे.सुरवातीला चोरट्यांनी या रस्त्यावरील पवार मोबाईल हे दुकान फोडून आठ ते दहा हँडसेट आणि आठ ते दहा हजार रोकड लंपास केली होती त्यानंतर याच रांगेतील शिरोडे प्रोव्हिजन फोडून तेथून काही रोकड व ड्रायफूट लंपास केले व आता पुन्हा दि. १६ च्या रात्री राजकमल फूट वेअरच्या वरील पत्र्याचे स्क्रू काढून दुकानातील चार ते पाच हजारांचे चप्पल व बूट लंपास केले आहेत. याबाबत दुकानाचे मालक जयेश राजेंद्र राठोड यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिली आहे.दरम्यान सदर रस्त्यावरील असंख्य व्यावसायिकांनी देखील पोलिसांकडे कैफियत मांडून सदर चोरट्यांचा बंदोबस्त करावा आधीच दिवाळीत धंद्यात तेजी नसून त्यात चोरटे या पद्धतीने धुडगूस काढून नुकसान करीत असल्याने आम्ही भयभीत झालो असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.यांच महिन्यात अज्ञात चोरट्यानी जुना बस स्टॅण्ड परिसरातील काही दुकानांवर देखील डल्ला मारला आहे. दरम्यान पोलिसांनी याठिकाणी पोलीस पेट्रोलिंग वाढवून सदर चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी होत आहे.