तलाठी संघाने जिल्हाभर काम बंद आंदोलन पुकारण्याचा दिला इशारा…
अमळनेर:- तलाठी पथकावर वाळू चोरांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करत २१ पर्यंत आरोपींना अटक न झाल्यास तलाठी संघाने जळगाव जिल्हाभर काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
दिनांक १९ रोजी महसूलचे पथक अवैध गौण खनिज चोरांवर कारवाई करायला गेले असता पातोंडा येथील भूषण उर्फ सोनू देवरे व इतर तिघांनी पथकावर प्राणघातक हल्ला केला. त्यात संदीप शिंदे व प्रकाश महाजन गंभीर जखमी झाले. आरोपींविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र २४ तास उलटूनही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. म्हणून २१ पर्यंत आरोपींना अटक न झाल्यास तलाठी संघाने काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. काम बंद आंदोलन जिल्हाभर करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन दिले. यावेळी अध्यक्ष जी आर महाजन, कार्याध्यक्ष एस ए कुलकर्णी, चिटणीस, तलाठी पराग पाटील, वाल्मिक पाटील, महेंद्र भावसार, वाय आर पाटील, पी एस पाटील, ए बी सोनवणे, प्रथमेश पिंगळे, सतीश शिंदे, अमोल सोनवणे, पिंटू चव्हाण, वैशाली भामरे, शीतल पाटील, नीता पजई, ज्योती घुसिंगे उपस्थित होते.