
कुठलीही करवाढ न करता मालमत्ता हस्तांतरण फी निम्मे केली
अमळनेर :- शहराच्या सर्वांगीण, संतुलित व शाश्वत विकासाच्या दृष्टीने अमळनेर नगरपरिषदेचा आर्थिक वर्ष २०२६–२७ चा ३८३ कोटी ८३ लाख ८३ हजार ३८३ रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहात विधिवत सादर करण्यात आला. नागरिकांवर कोणताही अतिरिक्त करभार न टाकता विकासाला गती देण्याचा स्पष्ट संकल्प या अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आला आहे.
सदर अर्थसंकल्प लेखापाल सुदर्शन श्यामनानी व लेखा परीक्षक कुणाल कोष्टी यांनी अध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर यांना सादर केला तो दुरुस्त करून त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सादर केला. उपनगराध्यक्ष प्रशांत निकम तसेच सर्व नगरसेवक/नगरसेविका यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध सूचना व प्रभागनिहाय अपेक्षा विचारात घेऊन अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
🔹 अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे :
नागरिकांवर कोणतीही नव्याने करवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. नागरिकांना दिलासा देण्याच्या भूमिकेतून मालमत्ता हस्तांतरण फी २% वरून १% करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आलेला असून विशेष सर्वसाधारण सभेने देखील तो एकमताने मंजूर केलेला आहे.
पाणीपुरवठा व्यवस्थेचे सुदृढीकरण व दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यावर भर.
शहरातील अंतर्गत तसेच प्रमुख रस्त्यांच्या विकासकामांना विशेष प्राधान्य.
स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी स्वतंत्र तरतूद.
नागरी सेवा व मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी आवश्यक आर्थिक नियोजन.
केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांसाठी निधी मागणीमध्ये वाढ प्रस्तावित करण्यात आलेली असून अधिकाधिक अनुदान प्राप्त करून शहरातील प्रलंबित व नव्या विकासकामांना गती देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आर्थिक शिस्त, पारदर्शकता व वेळबद्ध कार्यवाही यांवर विशेष लक्ष केंद्रीत.
🔹 अर्थसंकल्पीय तरतुदी :
सदर अर्थसंकल्पानुसार एकूण महसुली उत्पन्न अंदाजित रु. ९३.८४ कोटी तर भांडवली उत्पन्न अंदाजित रु. २८९.९९ कोटी प्रस्तावित करण्यात आलेले असून एकूण जमा रु. ३८३.८३ कोटींचा ऐतिहासिक व जादुई टप्पा गाठण्यात आलेला आहे. नगरपरिषदेच्या आर्थिक नियोजनशक्तीचा व वाढत्या विकासदृष्टिकोनाचा हा प्रत्ययकारी दाखला मानला जात आहे.
तसेच एकूण महसुली अंदाजित खर्च रु. ९३.८१ कोटी व भांडवली अंदाजित खर्च रु. २८९.९९ कोटी प्रस्तावित करण्यात आलेला असून काटेकोर आर्थिक शिस्त व नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे अंदाजे रु. ३.१६ लाख इतकी शिल्लक राखण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले.
अध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांनी शहराच्या संतुलित विकासासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण नियोजन करण्यात आल्याचे नमूद केले. मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांनी नियोजनबद्ध खर्च व वेळेत अंमलबजावणी यावर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. उपाध्यक्ष श्री. प्रशांत निकम यांनी सर्व प्रभागांचा समान विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला.




