तालुक्यातील चार गावात राबवण्यात येणार कार्यक्रम…
अमळनेर:- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शेतकऱ्यांसाठी ‘साठवणुकीतून समृद्धीकडे’ नेण्यासाठी ‛वखार आपल्या दारी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तालुक्यात चार गावात हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळाल्यास त्यांचे नुकसान होते, किंवा माल घरी साठवून ठेवल्यास खराब होतो किंवा जागा नसल्याने त्यांना कमी भावात माल विक्री करावा लागतो म्हणून शेतकऱ्यांना सात बारा वर वखार भाड्यात ५० टक्के सवलत, वखार केंद्रावर शेतकऱ्यांसाठी २५ टक्के राखीव जागा आणि ब्लॉक चेन अंतर्गत ९ टक्के व्याज दराने शेतमाल तारण कर्ज मिळू शकते, ठेवलेल्या मालावर १०० टक्के विमा, शेतकऱ्यांच्या साठवलेल्या माल खराब होऊ नये अथवा कीड लागू नये म्हणून वखार महामंडळातर्फे धुरळणी, फवारणी केली जाते, आदी विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथे २२ रोजी सकाळी ९ वाजता, जळोद येथे २९ रोजी सकाळी ९ वाजता, चोपडाई – कोंढावळ येथे ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता तर श्री क्षेत्र पिंगळवाडे येथे २० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शेतकऱ्यांना ‛वखार आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत दीपक महाजन, कैलास बोरसे मार्गदर्शन करणार आहेत. तरी शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शेतकरी समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन साठा अधीक्षक दीपक महाजन यांनी केले आहे.