आरोपींना न्यायालयाने सुनावली सात दिवसांची पोलीस कोठडी…
अमळनेर:- महसूल पथकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मालक दोघांना पोलिसांनी अटक केली असून आरोपींना न्या नमिता यादव यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
१९ रोजी दहिवद येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून पोलीस स्टेशनला जमा करण्यासाठी नेत असताना पातोंडा येथील ट्रॅक्टर मालक भूषण उर्फ सोनू देवरे आणि चालक योगेश संतोष पाटील यांनी तलाठी संदीप शिंदे, प्रकाश महाजन, योगेश पाटील, मधुकर पाटील या महसूल पथकावर ट्रॅक्टर चालवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणला होता. दोघांवर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. आरोपी टाकरखेडा रस्त्याला सती माता मंदिराकडे आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, हेकॉ संदेश पाटील, अरुण बागुल, योगेश पाटील यांना पाठवले. पोलिसांनी आरोपीना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्या. नमिता यादव यांनी आरोपीना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.