
अमळनेर:- तालुक्यातील खापरखेडा येथील ७५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना दिनांक २८ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खापरखेडा येथील साहेबराव दामू पाटील (वय ७५) हे अल्पभूधारक शेतकरी असून दोन बिघे शेतीवर त्यांचा व पत्नीचा उदरनिर्वाह चालवत असत. त्यांची मुले कामासाठी बाहेरगावी राहत होती. मयत साहेबराव यांच्या पत्नी बाहेरगावी गेल्या असल्याने ते त्यांच्या आतेभाऊकडे जेवण करीत असतं. २८ रोजी दुपारी बारा वाजता आतेभाऊ त्यांना जेवणासाठी बोलवायला गेले असता त्यांनी राहत्या घरी छताच्या लोखंडी रॉडला दोराने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आतेभाऊ बाबुलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत. मयत शेतकऱ्यावर शेतीचे व हातउसनवारीचे कर्ज असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. नापिकी व कर्जाच्या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती.




