
विमा कंपनी टाळाटाळ करत असल्याने किसान काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
अमळनेर:- जळगाव जिल्ह्यातील २७ मंडळातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी मागणी किसान काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी केली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप हंगामाचे उत्पादन २० टक्क्यांपेक्षा कमी आले असून पावसाळ्यात जिल्ह्यातील २७ मंडळात २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडला होता. ह्या मंडळात कापूस पिकाची अग्रिम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र ओरीऐंटल इन्शुरन्स कंपनी मुद्दाम हेतुपुरस्कर रक्कम देण्यासाठी उशीर करत असून शासनाकडे खोटे अपील करत आहे. जिल्हा स्तरावर तसेच आयुक्तांच्या स्तरावर विमा कंपनीचे अपील फेटाळले गेले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीला जिल्हाधिकारी यांनी आदेश देवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. सदर निवेदन देतेवेळी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील (जिभाऊ) आदी उपस्थित होते. निवेदनावर बाजार समिती संचालक डॉ. अनिल शिंदे, नितीन पाटील, शरद पाटील आदीच्या सह्या आहेत.
दरम्यान जिल्ह्यात तीन तीन मंत्री असून त्यांच्याकडून कोणतीही पाऊले उचलली जात नाहीत त्यामुळे ही विमा कंपनी शेतकऱ्यांना हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया…
सरकारी विमा कंपनी ही शेतकरी विरोधात अपील करत असून ह्या विमा कंपनीने कापूस पीकाची सुमारे ७२ कोटीची अग्रिम रक्कम सप्टेंबर महिन्यापासून अडवून धरली आहे. त्या पैश्यांवर शासनाने व्याज आकारून ते पैसे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिले पाहिजे.
:- प्रा. सुभाष पाटील, संचालक कृषी बाजार समिती, अमळनेर




