
पाचोरा तालुक्यातील बांबरुड येथील मामा भाचा ग्रुपने पटकावले प्रथम बक्षीस…
अमळनेर:- तालुक्यातील कन्हेरे येथील चिंचदेवी यात्रोत्सवानिमित आयोजित बैलगाडी शर्यतीत पाचोरा तालुक्यातील बांबरुड येथील मामा भाचा ग्रुपने प्रथम बक्षीस मिळवले आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा, पाचोरा , चाळीसगाव, कासोदा ,भडगाव , जुवार्डी, आंचळगाव , करमाड , घुसर्डी , करमुड ,निमगूळ , पळासखेडे आदी ठिकाणाहून ६० स्पर्धक सहभागी झाले होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत निमगुळ येथील महाकाल ग्रुप (द्वितीय), करमुड येथील भाऊसाहेब पहेलवान (तृतीय ), नालबंदी येथील बाबऱ्या ग्रुप (चतुर्थ ) ,निमगुळ येथील भवानी ग्रुप (पाचवा) , पळासखेडे येथील देवा ग्रुप (सहावा) आला आहे. विजेत्या बैलगाडी मालकांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
चिंचदेवी येथील यात्रा कार्तिक महिन्याच्या अष्टमी आणि नवमीला भरवली जाते. ही यात्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे.अष्टमीला चिंचदेवी यात्रोत्सव व नवमीला गयबानशहा बाबा उरूस भरवला जातो. गावात एकही मुस्लिम घर नाही तरी मंदिराच्या शेजारी गयबानशहा बाबांची समाधी आहे. कधी काळी हे मुसाफिर गावात आले होते अशी आख्यायिका आहे. यात्रोत्सवात दोन दिवसात पाच लोकनाट्य तमाश्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातून रसिक लोकनाट्य बघण्यासाठी येतात. खाद्य पदार्थ, खेळणी, करमणुकीची दुकाने थाटलेली असतात. हिंदू मुस्लिम बांधव यात्रेत उत्साहाने सहभागी होतात.




