लाखो भाविक घेणार दर्शन, परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड, गोवर्धन बोरगाव सह परिसराचे आराध्य दैवत व भारतातील तीन स्वयंभू भैरवनाथापैकी एक असलेल्या श्री कालभैरवनाथांचा मुख्य यात्रोत्सव दिनांक ५ पासून सुरू होणार असून आज महाकाल भैरवनाथ कार्तिकी अष्टमीला मुख्य यात्रोत्सव असून महाप्रसादाचे सकाळी ९ पासून वाटप करण्यात येणार आहे. माळण नदी पात्रात यात्रोत्सव साजरा करण्यात येणार असून यासाठी भैरवनाथ मंदिर संस्थान व पोलीस प्रशासन यात्रोत्सव यशस्वीतेसाठी सज्ज झाले आहे.
तालुक्यातीलच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणचे भाविकांचे श्रद्धास्थान व परिसराचे आराध्य दैवत असलेल्या भारतातील तीनच ठिकाणी स्वयंभू स्थान असलेले श्री कालभैरवनाथ मंदिराचा महिमा सर्वदूर असल्याने त्यातील माळण नदीकाठी असलेल्या स्वयंभू श्री काळभैरवनाथ मंदिराचा मारवड गोवर्धन बोरगावचे ग्रामस्थ सालाबादप्रमाणे कार्तिक अष्टमीला जयंतीच्या रुपात कालभैरव नाथांचा यात्रोत्सव साजरा करीत असतात. दरवर्षी धुमधडाक्यात यात्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी होऊन दिवसभर महाप्रसाद वाटप करून वरील तिन्ही गावातीलच आबालवृद्ध दिवसरात्र सेवा देऊन कालभैरव नाथांची रक्षा (धुनी ) कपाळी लावून नवसपूर्तीसाठी विशेष गर्दी होते. सोमवारी सायंकाळी ७ वाजता भव्य पालखी सोहळ्याची मिरवणूक पार पडली. रात्री ९ पासून रात्रभर अखंड एकतारी भजनी मंडळ भजन करून भैरवनाथ जागर करण्यात आला. तर दिनांक ५ रोजी मुख्य यात्रा महोत्सव निमित्त पहाटे ढोल वाजवून मंगल आरती तर ७:३० वाजता महायज्ञ पूजन करीत ध्वजारोहण तसेच सकाळी नऊ वाजेपासून महाप्रसादाचा भंडारा कार्यक्रम सुरू होईल. रात्री ९ वाजता लोकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा आयोजित केला आहे. तर दिनांक ६ रोजी पहाटे मंगलआरती करून व रात्री ७ वाजता सामूहिक प्रार्थना ध्यान आरती होईल. भैरवनाथ अष्टमी निमित्त संपूर्ण खानदेशासह दुरवरील भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. आतापासूनच माळन नदीच्या पात्रात पाळणे, पालखे, विविध विक्रेते, खेळणे विक्रेते, खाद्यपदार्थांची दुकानांची रेलचेल सुरू झाली आहे. संपूर्ण देशात असलेल्या तीन मंदिरांपैकी एक असलेल्या या मंदिरातील यात्रोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येणार असून परिसरातील नागरिकांमध्ये ही उत्साहाचे वातावरण आहे.
श्रीक्षेत्र पाडळसरे येथील केसरी भैरवनाथ मंदिरात अभिषेक, पूजन व भंडारा
पाडळसरे येथील ग्रामदैवत अंबिका मातेच्या मंदिरात मानेचा विळा ठेवून ध्वजारोहण करून मुख्य रस्त्यावर भव्य दिव्य केसरी भैरवनाथ मंदिर परिसरात विराजमान केसरी भैरवनाथ यांचा बाणाचे पूजन अभिषेक करून नैवेद्य दाखवून परिसरातील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन भंडारा आयोजित केला आहे. यासाठी लोण बुद्रुक येथील पोलीस पाटील ह्या सपत्नीक अभिषेक पूजन करून उपस्थित भाविकांची श्रद्धा व नवसपूर्ती करण्यासाठी मंडप , पिण्यासाठी पाणी , महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे , विद्युत रोषणाई करून मंदिर परिसरात झगमगाट निर्माण झाला असल्याने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.