
पाच दिवसांपासून सर्व्हर बंद असल्याने शेतकरी त्रस्त…
अमळनेर:- रब्बी पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून भरपाई मिळावी, यासाठी पिक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या पाच दिवसांपासून पीक विम्याचे सर्व्हर बंद असल्याने पिक विमा भरावा तरी कसा ? असा प्रश्न शेतक-यांंना पडला आहे. सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी, महा ई केंद्रचालक त्रस्त झाले आहेत.
खरीप हंगाम हातचा वाया गेल्यानंतर आता रब्बी हंगामात काहीतरी हाती येईल, या आशेने शेतकऱ्यांनी अपुऱ्या ओलीवर रब्बीची पेरणी केली होती. मात्र अवकाळी पावसाने जमिनीत ओलावा झाल्याने रब्बी पिके बऱ्यापैकी वाढीस लागली आहेत. तालुका परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने या पिकांना तूर्तास तरी जीवदान मिळाले आहे. या पिकांचा पिक विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी होत आहे मात्र गेल्या पाच दिवसापासून सर्व्हर डाऊन असल्याने. पिक विमा भरता येत नाही. तर कधी आधार तर कधी सातबारा संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये जात आहेत. याबाबत कंपनी किंवा सीएससी कडून कुठलीही माहिती मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रब्बी पिक विमा उतरवला उतरवला जात नसल्याने, एक रुपयात पिक विमा हे केवळ घोषणाच ठरते की काय ? असा प्रश्न केला जात आहे. पाच दिवसापासून सुरू असलेला सर्व्हरचा अडथळा केव्हा दूर होणार ? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांना सुरळीत पिक विमा भरता यावा यासाठी ऑनलाईनची सुविधा असली तरी सर्व्हर डाऊनमुळे दिवसभर महा-ई-सेवा केंद्रावर शेतकऱ्यांना थांबून राहावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.




