
जिल्ह्यात एकमेव मार्केट असताना घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक विक्रेते व हैराण…
अमळनेर:- येथील भाजी बाजाराच्या शेजारी केंद्र शासनाच्या योजनेतून निर्माण झालेल्या फिश मार्केट परिसरात गेल्यास हे फिश मार्केट की कचरा व घाणीचे मार्केट ? असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तत्कालीन नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांच्या काळात विद्यमान मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हे फिश मार्केट मंजूर केले असून जळगाव जिल्ह्यात एकमेव अमळनेर शहरात हे मार्केट साकारले आहे, सर्व सुविधांयुक्त असे हे मार्केट असून याठिकाणी अनेक विक्रेते आपल्या व्यवसाय करीत आहेत,गत वर्षात येथे विक्रेते वाढल्याने या फिश मार्केटच्या बाहेरील आवारात देखील अनेक विक्रेते आपली दुकाने थाटत आहेत.विशेष म्हणजे जळगाव जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मच्छीची विक्री अमळनेरात होत असल्याने मोठे फिश मार्केट म्हणून अमळनेर मार्केटची गणना होत असते. इमारत आणि विक्री याबाबत हे मार्केट मोठे असले तरी या परिसरात दररोज प्रचंड जी घाण निर्माण होते त्यावरून अमळनेरचे फिश मार्केट मोठे असे म्हणायला देखील नक्कीच लाज वाटत असते.
आजूबाजूला प्रचंड घाण, प्रचंड दुर्गंधी यामुळे आजूबाजूला न पाहता तोंडाला रुमाल लावूनच मार्केटमध्ये प्रवेश करावा लागत असतो. या घाणीमुळे दररोज येणारे ग्राहक आणि या व आजूबाजूला असलेले इतर विक्रेते देखील त्रासलेले असून आम्हाला इमारत आणि विक्रीच्या बाबतीत टॉपचे असलेले हे फिश मार्केट स्वच्छतेच्या बाबतीत मागे का ? असा सवाल नागरिक उपस्थित करीत असून नगरपालिकेने हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.




