
एकाविरुद्ध पोक्सोसह अन्य कलमांखाली गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- शहरातील मेहतर कॉलनीत अल्पवयीन मुलीला धमक्या देवून विनयभंग करणाऱ्या एकाविरुद्ध अमळनेर पोलिसांत पोक्सोसह अन्य कलमांखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मेहतर कॉलनीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या विधवा आई, आजी आणि लहान भावासह राहत असून त्यांच्या गल्लीच्या मागे राहणारा अक्षय प्रताप बारसे हा गेल्या दोन महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत असे. सदर अल्पवयीन मुलगी क्लाससाठी जात असताना फोन करत जा नाहीतर तुझ्या लहान भावाला मारून टाकेल अशी धमकी देत असे. दिनांक ७ डिसेंबर रोजी त्याने भावाच्या मोबाइलवर फोन करून मला भेटायला ये असे सांगितले. सदर मुलीने त्यास नकार दिल्याने जर भेटायला आली नाही तर तुझ्या भावाला जिवानिशी मारून टाकेल अशी त्याने धमकी दिली. घडलेला प्रकार सदर अल्पवयीन मुलीने आपल्या आईला सांगितल्याने त्या दोघांनी तडक पोलीस स्टेशन गाठले. सदर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीसात पोक्सो, तसेच कलम ३५४(अ आणि ड), व कलम ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एसआय विकास शिरोळे करीत आहेत.




