
महसूल पथकाची कारवाई, अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारी वाढल्याने महसूलच्या पथकाने शहरात विविध भागात कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे ६ टेम्पो पकडले असून अमळनेर पोलिसांत चालक मालकांसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व तहसिलदार रुपेशकुमार सुराणा यांनी चार पथक तयार करत दिनांक ९ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरात अयोध्यानगर, मुंदडा नगर, शिरूड नाका, बहादरवाडी फाटा आदी ठिकाणी छापे टाकत अवैध गौण खनिज वाळू वाहतूक करणारे ६ टेम्पो पकडण्यात आले. सर्व टेम्पो व वाळू असा एक लाख त्रेपन्न हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल अमळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. या महसूल पथकात मंडळ अधिकारी गौरव शिरसाठ, एन. डी धनराले, वाय आर पाटील, व्ही. पी. पाटील, तलाठी स्वप्नील कुळकर्णी, पराग पाटील, वाल्मीक पाटील, बळीराम काळे, सतिष शिंदे, प्रदिप भदाणे, महेश अहिरराव, ए. बी. सोनवणे, तिलेश पवार, प्रमोद माळी, महेंद्र पाटील, आय.एस. महाजन यांचा समावेश होता. याप्रकरणी गजानन लक्ष्मण बडगुजर, समाधान सोमा भोई, गौरव चव्हाण, संदेश भोई, मंगल भील, अजय भोई व अनोळखी पाच अश्या अकरा टेम्पो चालक व मालकांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ जयंत सपकाळे हे करीत आहेत.




