शहरात चार ठिकाणी कारवाई करत सव्वा लाखाचे दारू व रसायन जप्त…
अमळनेर:- अमळनेर पोलिसांच्या पथकाने शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी गावठी दारूच्या भट्ट्यांवर छापे टाकून भट्टी नष्ट केल्या असून एकूण १ लाख १५ हजार ७०० रुपयांची दारू व रसायन जप्त केले आहे.
शहरात गावठी दारूची विक्री जोरात सुरू झाली होती. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, घनश्याम पवार, हितेश चिंचोरे , श्यामकांत पवार, रवींद्र पाटील, मोनिका पाटील यांची दोन पथके एकाचवेळी कारवाईसाठी पाठवली. पोलिसांनी तांबेपुरा भागात हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूला सतपालसिंग तरसेमसिंग शीख (वय ३९ वर्षे) यांच्याकडे छापा टाकून ५ हजार रुपयांची ५० लिटर गावठी दारू पकडली. ताडेपुरा भागात कैलास अमृत भिल (वय ४५ वर्षे) यांच्याकडे १ लाख रुपये किमतीचे २ हजार लिटर कच्चे रसायन, १० हजार रुपयांची १०० लिटर दारू जप्त करून हातभट्टी उध्वस्त करण्यात आली आहे. तर पारोळा रोडवरील रेखाबाई सोमा भिल (वय २९) हिच्याकडे छापा टाकून २ हजार ७०० रुपयांची २७ लिटर दारू जप्त केली. तसेच पिंपळे रोडवरील शांताबाई नगर मधील सुरेश शंकर मोरे (वय ३५) यांच्याकडून २ हजार रुपयांची दारू जप्त केली. चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.