मंगळग्रह सेवा संस्था व ग्रामीण रुग्णालय राबवणार संयुक्तिक उपक्रम…
अमळनेर:- १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त १५ डिसेंबरपर्यंत संपूर्ण जगात एचआयव्ही जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने १२ डिसेंबर रोजी मंगळग्रह सेवा संस्था व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळग्रह मंदिर परिसरात एचआयव्ही जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी, सकाळी १० वाजता मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर उपक्रमाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमात एचआयव्ही संदर्भात पोस्टर प्रदर्शन, चल चित्रफीत, एचआयव्ही समुपदेशन, चाचणी, पथनाट्य तसेच एचआयव्ही बाबत अधिक जाणून घेण्यासाठी चालता बोलता अशा विविधांगी उपक्रम राबविले जाणार आहेत. याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रांजल पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे, डॉ. जी. एम. पाटील, डॉ. आशिष पाटील, एआरटी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शिंदे, आयसीटीसी समुपदेशक अश्वमेघ पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दवेंद्र मोरे, एआरटी समुपदेशक जयेश मोरे आदी उपस्थित राहणार आहेत. उपक्रम यशस्वीतेसाठी एचआयव्ही तपासणी व समुपदेशन कक्ष व एआरटी उपचार केंद्र तसेच शहरातील विविध खाजगी हॉस्पिटल व तेथील प्रयोगशाळांचे सहकार्य लाभणार आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सदर उपक्रमाचे अवलोकन करण्यात येणार असून लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.