
अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावला निर्णय…
अमळनेर:- अल्पवयीन मुलीला धमकी देत चोपड्यातून अमळनेरला पळवून आणणाऱ्या चोपड्याच्या दोघांना अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी पावणेसात वाजता चोपडा येथील एक अल्पवयीन मुलगी कस्तुरबा शाळेत जात असताना गुलाम रसूल शेख मस्तान मोमीन (रा मिल्लत नगर चोपडा) याने तिला धमकी दिली आणि त्याच्यासोबत येण्यास सांगितले. जर तू येणार नाही तर तुझे आणि माझे प्रेमसंबंध आहेत आणि लग्न झाले आहे असेही सांगेल. अशी धमकी देऊन पीडित मुलीला तो बसने अमळनेर घेऊन आला. तेथून त्याने त्याचा मित्र शेख मुज्जकिर हमीद पिंजारी (रा मण्यारअळी, चोपडा) याला फोन लावून बोलावून घेतले. दोघे जण पीडित मुलीला गांधलीपुरा भागात मुस्लिम वस्तीत घेऊन गेले. काही हिंदू मुलांनी मुस्लिम मुलांसोबत हिंदू मुलगी पाहिली म्हणून तणाव किंवा अनर्थ होऊ नये म्हणून त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस येताच गुलाम रसूल पळून गेला. पोलिसांनी पीडितेच्या पालकांना बोलावले. चोपडा शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध पोस्को आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहा. पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी तपास करून दोघा आरोपींना अटक केली होती. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. ॲड राजेंद्र चौधरी यांनी युक्तीवाद करून अकरा साक्षीदार तपासले. रिक्षाचालक आणि गांधलीपुरा भागातील प्रत्यक्ष साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून न्या. पी आर चौधरी यांनी आरोपीना सात वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच १०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवसांचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून सहा उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे, पोलीस नाईक हिरालाल पाटील, नितीन कापडणे,राहुल रणधीर, अतुल पाटील यांनी काम पाहिले.




