खोदलेली चारी बुजवली, महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप…
अमळनेर:- तापी काठावर धावडे गावांच्या नदीच्या वाळू पात्रातून पुन्हा मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत असून वाळू चोरांनी रस्त्यात खोदलेली चारी पुन्हा बुजून अवैध वाळू वाहनांचा मार्ग मोकळा केला आहे. महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मोठ्या प्रमाणात वाळू उपशामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होऊन भविष्यात आम्हा गावकऱ्यांना पाण्याची झळ बसण्याची शक्यता असल्याची संतप्त भावना ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष तथा सरपंच ॲड. उमाकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. धावडे हे सावखेडा हुन तीन किलोमीटरच्या अंतरावर असून अमळनेर व धरणगाव कडील अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे रात्री धावडे येथील नदीच्या वाळू पात्रातून हजारो ब्रास वाळूची अवैधरीत्या चोरी करत आहेत.वाळू चोरीमुळे नदीत मोठं मोठे खड्डे तयार झाले आहेत. मागे महसूल कर्मचाऱ्यांनी धावडे येथील नदी पात्रात जाणाऱ्या रस्त्यावर जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदली होती मात्र वाळू चोरट्यांनी सदर चारी मातीने बुजवून टाकली आहे त्यामुळे त्यांचे वाहतूकीचे ट्रॅक्टर पुन्हा सुसाट सुरू आहेत. ग्रामपंचायत मध्ये स्थापन असलेल्या ग्राम दक्षता समितीने वाळू चोरीचा मुद्दा वारंवार महसूल विभागाला कळविला असूनही ग्राम दक्षता समितीचे कुणी ऐकत नसल्याचा आरोप खुद्द समितीच्या अध्यक्षांनी केला आहे.बेसुमार वाळू चोरीमुळे भविष्यात आम्हा नदी काठच्या गावांना देखील पिण्याच्या पाण्याची झळ बसू शकते, म्हणून महसूल विभागाने ह्या अवैध वाळू वाहतुकीचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच ॲड. उमाकांत पाटील यांनी केली आहे.