
गेल्या चाळीस वर्षापासून सुरू सुरू होता वाद, दोन्ही समाजात घडवून आणले सामंजस्य…
अमळनेर:- हिंदू मुस्लिम धार्मिक स्थळावरून गेल्या चाळीस वर्षापासून सुरू असलेल्या वादावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तोडगा काढून हा प्रश्न कायमचा सोडवण्यात यश मिळवल्याने जातीय सलोखा निर्माण झाला. दोन्ही स्थळाच्या दरम्यान रस्ता सोडून इतर बांधकामाला प्रारंभ करण्यात आला.
अमळनेर फापोरे रस्त्यावर रुबजी नगर परिसरात खारोट कब्रस्थान, खळेश्वर महादेव मंदिर, महानुभाव पंथची दफनभूमी आणि बिस्मिल्ला बाबा दर्गा आहे. कब्रस्थानच्या कंपाऊंडचे बांधकाम सुरु असताना ते मंदिराच्या जागेत बांधले जात आहे असा आरोप करत हिंदू मुस्लिम समाजात दंगल झाली होती. दोन्ही समाजात गेल्या चाळीस वर्षांपासून वाद सुरू होते. आणि याच वादावरून वैमनस्य काढत पुन्हा दोन तीनदा दंगली घडल्या होत्या. यामुळे विकास कामांना देखील अडथळा निर्माण झाला होता. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी या विषयावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी दोन्ही समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींशी दोन तीनदा बैठक केली. त्याच प्रमाणे प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याशी देखील चर्चा केली. नव्याने जागेचा नकाशा बनवण्यात आला. कब्रस्थान, महादेव मंदिर यांच्यादरम्यान स्वतंत्र रस्ता काढण्यात आला. या रस्त्यामुळे महानुभाव पंथातील नागरिकांना त्यांच्या दफनविधित जाणे सुकर झाले. तसेच हिंदू आणि मुस्लिम बांधव दर्ग्याची जोपासना करतात त्यांनाही दर्ग्यापर्यंत पोहचणे सोयीस्कर झाले. यावर महसूल अधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब करण्यात येऊन हिंदू आणि मुस्लिम दोन्ही गटातील आठ आठ प्रतिष्ठित लोकांच्या सह्या घेऊन मान्यता घेण्यात आली. आणि दोन्ही समाजाने बिस्मिल्ला दर्गाची जोपासना करावी असेही ठरवण्यात आले. अधिकारी व नागरिक यांच्या उपस्थितीत आखणी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ, मयूर तोंदे, माजी उपनागराध्यक्ष विनोद लांबोळे, शिवकुमार महाजन, मनोज शिंगाणे, माजी नगरसेवक शेखा हाजी सलीम फत्तू, राजू शेख, प्रवीण भोई, अबरोज मिस्त्री,मस्तान मिस्त्री, मुकसाद शेख, चंद्रकांत कोळी, रवींद्र कोळी, छोटू कोळी, राधेश्याम कोळी, संजय भोई, अजय भोई, राहुल भोई,अनिल भोई हजर होते. प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे अनेक वर्षांपासूनच्या वादावर पडदा पडला. यावेळी दोन्ही समाजाच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला.




