
एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कुलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन…
अमळनेर:- अज्ञानातून आपल्याला विज्ञानाकडे जायचे असल्याने मुलांसाठी असे विद्यार्थी प्रदर्शन भरविले जात असते. शासन कार्यक्रम देते म्हणून आपण केवळ कार्यक्रम म्हणून त्याकडे न पाहता मुलांनी प्रॅक्टिकल बनावे,शिक्षकांनी देखील तेच धोरण ठेवावे येथे सहभागी विद्यार्थी एक दिवस नक्कीच अमळनेरचे नाव उज्वल करतील असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केला.
पंचायत समिती शिक्षण विभाग, एन टी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कुल व तालुका विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंदडा ग्लोबल स्कुल मध्ये आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ते बोलत होते. प्रदर्शनाचे उद्घाटन नामदार पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. सुरवातीला त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन हवेत बलून सोडून शुभारंभ करण्यात आला.यावेळी मंचावर माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर, गटविकास अधिकारी सुशांत पाटील ,मुंदडा फाऊंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, संचालिका दीपिका मुंदडा, मार्केट सभापती अशोक आधार पाटील, ग्लोबल स्कुलचे प्राचार्य एल लक्ष्मण,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,प्रा सुरेश पाटील विस्तार अधिकारी कविता सुर्वे ,विद्या लक्ष्मण,विजय जैन,डी ए धनगर आदी मान्यवर उपस्थित होते,सुरवातीला प्रास्तविक करताना गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी शालेय जीवनात विज्ञानचे फार महत्व असुन या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून त्यांचा नवीन संशोधनाकडे कल वाढतो, भविष्यात मुलांनी संशोधनाकडे वळावे हाच शासनाचा उद्देश असून ग्रामीण विद्यार्थी संशोधक झाला पाहिजे यासाठी हे प्रदर्शन असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात पुढे बोलताना नामदार पाटील म्हणाले की, ज्याच्यात कल्पकता व धमक असते तेच विद्यार्थी यात भाग घेतात, मोबाईल वापरण्यापेक्षा बनविण्याऱ्यासारखे मला व्हायचे आहे अशी इच्छा ठेवाल तरच स्पर्धेच्या युगात टिकू शकाल,हे प्रदर्शन काही पालक गांभीर्याने घेत नाहीत,मुलांना प्रोत्साहन देत नाही,असे न करता त्यांना प्रेरणा द्यावी तरच ते काहीतरी करू शकतील, येणाऱ्या काळात या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देण्यासाठी एखादे फाऊंडेशन निर्माण करू अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तनस्वी पाटील, दिशा पाटील , संजय पाटील, प्रमिला अडकमोल यांनी मनोगत व्यक्त केले.
यांनी पटकावले बक्षीस…
माध्यमिक विभाग -प्रथम साईराज रोजेकर (सानेगुरुजी माध्यमिक विद्यालय), द्वितीय पियुष महाजन (शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे), तृतीय-धीरज पाटील (बीबी ठाकरे विद्यालय वावडे), उत्तेजनार्थ- तन्वी पाटील (एन टी मुंदडा ग्लोबल स्कूल), प्रणव पाटील (सरस्वती माध्यमिक विद्यालय सडावण )
माध्यमिक शिक्षक गट प्रथम – संजय पाटील (आर्मी स्कूल), द्वितीय डॉ भाग्यश्री वानखेडे (जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय), प्रमिला अडकमोल (फापोरे माध्यमिक विद्यालय)
प्रयोगशाळा परिचर-ललित शिंदे ,(एन टी मुंदडा ग्लोबल स्कूल)
प्राथमिक विभाग ,प्रथम डॅफोडील सोनवणे (एन टी मुंदडा ग्लोबल स्कूल), द्वितीग देवेंद्र दगडू माळी(के डी पाटील हायस्कूल सावखेडा) , तृतीय पिंटू राजेंद्र पवार (शांती निकेतन प्राथमिक विद्यामंदिर),उत्तेजनार्थ वैष्णवी भिका पाटील (सेन्ट मेरी हायस्कूल मंगरूळ), कृष्णा पाटील (जिल्हा परिषद शाळा देवगाव देवळी)
प्राथमिक शिक्षक गट प्रथम अनिता बिऱ्हाडे ,द्वितीय उमेश पाटील , तृतीय नेहा पाटील यांनी बक्षीस पटकावले. परीक्षक म्हणून बी आर महाजन, अतुल महाजन , विजय मोरे ,संजय पाटील यांनी काम पाहिले.
यावेळी गणित मंडळ अध्यक्ष डी ए धनगर, विज्ञान मंडळ अध्यक्ष निरंजन पेंढारे, कार्याध्यक्ष डी के पाटील ,केंद्रप्रमुख शरद सोनवणे, दिलीप सोनवणे, अशोक सोनवणे, चंद्रकांत साळुंखे, किरण शिसोदे, राजेंद्र गवते, भगवान पाटील यासह शिक्षक वृंद पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.
१७८ विद्यार्थी व ४० शिक्षकांचा प्रदर्शनात सहभाग…
सदर विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागाचे १५ व माध्यमिक विभागाच्या २५ शिक्षकांचा सहभाग असून विद्यार्थी गटात प्राथमिक विभागाचे ८८ तर माध्यमिक विभागाच्या ८० विद्यार्थ्यांचा तर एका प्रयोगशाळा सहाय्यकाचा सहभाग आहे.विद्यार्थ्यांनी उत्तम संशोधन करून प्रयोगाचे विविध मॉडेल सादर केले आहेत,सदर संपूर्ण प्रदर्शनाची मंत्री अनिल पाटील यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.




