
अमळनेर:- तालुक्यातील आठही मंडळात २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी किसान काँग्रेसच्या वतीने करत शेतकऱ्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
सन २०२१ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे तालुक्यातील आठही मंडळात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे करून निधीची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करून ही कोणतीही मदत देण्यात आली नाही. त्यासंदर्भात डिसेंबर २०२१ मध्ये किसान काँग्रेसच्या वतीने प्रा. सुभाष पाटील यांनी तहसीलदारांना अतिवृष्टीचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत दोन वर्ष उलटत आली तरी कोणतीही मदत दिली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून किसान काँग्रेसकडून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे.
प्रतिक्रिया :-
वेळोवेळी मागणी करूनही दोन वर्ष उलटली तरी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नसून त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागणीला प्रशासन जर दाद देणार नसेल तर आंदोलन उभारण्याशिवाय पर्याय नाही.
प्रा. सुभाष पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष, किसान काँग्रेस जळगाव




