
अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे येथे बंद घराचे कुलूप तोडून ६६ हजाराचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दिनांक १८ रोजी उघडकीस आली असून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील एकलहरे येथील गं.भा. हीराबाई धर्मराज पाटील ह्या दिनांक १५ रोजी बाहेरगावी लग्नासाठी गेल्या होत्या. दिनांक १७ रोजी सायंकाळी सहा वाजता त्या परत आल्या असता राहत्या घराच्या कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी घरात जावून पाहिले असता गोदरेज कपाटातून ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असे ६६ हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. मारवड पोलिस ठाण्याचे सपोनि शीतलकुमार नाईक, पीएसआय विनोद पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.




