
शिरूड येथील तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल…
अमळनेर:- लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत एका प्राध्यापिकेला निझर (गुजरात) येथे सोडून पळून गेलेल्या अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्राध्यापिका असलेल्या एका तरुणीचे शिरूड येथील सचिन नाना पाटील (वय २८ रा शिरूड हल्ली मुक्काम धडगाव जि नंदुरबार) याच्याशी दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. सहा महिन्यांपूर्वी सचिनने लग्नाचे आमिष दाखवले होते. १८ रोजी सचिन त्या तरुणीला ढेकू रोड येथे मोटरसायकलने घ्यायला आला व तिला धडगाव येथे नेले. १९ रोजी नाशिक येथे जाऊन लग्न करणार होते. सचिनने त्याच्या आईला पीडित तरुणीशी लग्न करणार असल्याचे सांगितले, त्यावेळी त्याच्या आईने लग्न करण्यास नकार दिला आणि सचिनच्या वागण्यात बदल झाला. त्याचवेळी त्याला त्याच्या नातेवाईकांचा देखील लग्न न करण्यासाठी फोन आला. २० रोजी पीडित तरुणीने त्याला आपण लग्न करू असे सांगितल्यानंतर सचिन तिला मोटरसायकलवर घेऊन तळोदा निझर (गुजरात)कडे निघाला. रस्त्यात सचिन हॉटेल राजमंगल वर थांबून दारू पिला आणि तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. तिथेच तो त्या तरुणीला सोडून निघून गेला. तरुणी रडत असतांना आजूबाजूच्या लोकांनी तिच्या मोबाईलवरून लोकेशन देऊन तिच्या नातेवाईकांना बोलावले. तरुणीला सोबत घेऊन नातेवाईकांनी अमळनेर पोलीस स्टेशन गाठले. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून सचिन विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.




