जीवितहानी टळली, मात्र संसारोपयोगी साहित्य जळून खाक…
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना काल दिनांक २४ रोजी घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
तालुक्यातील कळमसरे गावातील दुर्गानगर भागात राहणारे घनश्याम रामेश्वर वैराळे यांच्या घरात काल सकाळच्या सुमारास घरातून तसेच छतावरील डगमधून मोठा धूर निघत असल्याचे शेजारच्या रहिवाशांना निदर्शनास आले आणि एकच धावपळ उडाली. घरमालक घनश्याम वैराळे हे यावेळी शेवटच्या खोलीत झोपले होते. अनेकांनी त्यास आवाज दिल्याने ते जागे झाले, तोपर्यंत घरात संपूर्ण धूर झाला होता.किचन रूम मधील असलेले फ्रीज पूर्णतः कोळसा झालेले दिसून आले. गावातील तरुणांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत घरमालक यांना सुखरूप बाहेर काढीत घरातील वीजपुरवठा खंडित करून पेट घेतलेले फ्रीज देखील बाहेर काढले. यावेळी घरातील संसारोपयोगी साहित्य देखिल जळून खाक झाले होते.यामध्ये फ्रीजसह घरातील फॅन विद्युत प्रवाह बोर्ड भांडी,डबे,त्यातील कडधान्य, धान्य कपडे संसार उपयोगी वस्तू आदींचा यात समावेश आहे.
दरम्यान या घटनेत त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून, मोलमजुरी करणारे हे कुटुंबं या घटनेमुळे हताश झाले आहे. हा शॉर्ट सर्किट झाल्याने डोळ्यासमोर संसार जळाल्याने घनश्याम वैराळे व त्यांची आई शोभाबाई वैराळे यांना अश्रू अनावर झाले होते.