
अमळनेर:- सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे पुण्यक्षेत्रम् निम येथे श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी झाली. याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 10 वाजता उदी कुंभाची दिंडी पालखी मिरवणूक दिगंबरा दिगंबराच्या गजरात निघाली.तापी व पांझरा नदीच्या काठी निसर्गरम्य वातावरणात भक्तांच्या जल्लोषात दिंडी निघाली. यावेळी सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दुपारी 12 वाजता पांझरा काठी, उत्सव मंडपात श्री दत्तगुरु, श्रीपाद श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ व साईनाथ यांच्या तस्बिरी सोबत उदी कुंभाची स्थापना झाली.झेंडूच्या फुलांची सुंदर सजावट,आरास हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते आणि केळीचे खांब तसेच गुढ्या, आकाश कंदिल यामुळे सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. ह्या कार्यक्रमाचे जवळपास सर्व नियोजन पर्यावरणपूरक होते.
नंतर श्री दत्तसहस्त्र नामावलीचे पठण होऊन भक्तिमय वातावरणात आरती झाली. येथे स्वयंशिस्त ,भक्ती आणि सेवा यांचा त्रिवेणी पहायला मिळाली. घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण होऊन दर्शन झाले. पुढील महिनाभर सुरु असलेली वर्धमान व्रताधिराज उपासना आणि दत्तअवधूत कैवल्ययाग
ह्याच परिसरात महिनाभर होणार आहेत. अनेक मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. सायंकाळी उत्सावाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी देशभरातून सुमारे 3000 भाविक आले होते. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी जळगाव, धुळे आणि नंदूरबार, जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक बापूभक्तांनी परिश्रम घेतले.




