
अमळनेर पोलिसांनी छापा टाकून आरोपीला पकडले रंगेहाथ…
अमळनेर:- चोरून लपून मोटरसायकलवर अमळनेर शहरात गांजा आणणाऱ्या दहिवद येथील तरुणावर अमळनेर पोलिसांनी छापा टाकून त्याच्या जवळून ११ किलो गांजा जप्त केल्याची घटना २ रोजी पहाटे पावणेदोन वाजता धुळे रोडवर रेणुका टाईल्सच्या मागे घडली.

अमळनेर शहरात एक तरुण मोटरसायकलवर गांजा विक्रीसाठी आणत असल्याची माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांना मिळाल्यावर त्यांनी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांना माहिती देऊन ताबडतोब हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, शरद पाटील, निलेश मोरे, रवींद्र पाटील, दीपक माळी, गणेश पाटील,जितेंद्र निकुंभे, सुनील महाजन यांना घेऊन धुळे रस्त्यावर साई दरबार हॉटेलजवळ दबा धरून बसले. एक तरुण मोटरसायकलला दोन काळ्या रंगाच्या पिशव्या घेऊन रेणुका टाईल्सच्या मागे लपला असल्याची माहिती मिळताच त्याच्यावर छापा टाकण्यात आला. त्याच्या जवळील पिशव्यांमध्ये १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा गुंगी आणणारा ११ किलो ७५ ग्रॅम ओलसर गांजा आढळून आला. आरोपीला अटक करून त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव पिंट्या देवराम रावत (वय २४) रा. उमरापाणी ता. वारला जिल्हा बडवाणी हल्ली मुक्काम दहिवद ता. अमळनेर असल्याचे सांगितले. पोलिसांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या समक्ष पंचनामा करून पिंट्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ द्रव्य एनडीपीएस कायदा १९८५च्या कलम ८, २०, २२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.




