
अमळनेर:- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्याची डागडुजी करण्यात आली असून सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात आल्याचा दावा उपकार्यकारी अभियंता महाजन यांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांची पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती. त्यामुळे वाहनधारक व प्रवासी यांचे मोठे हाल होत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या समस्यांची दखल घेत जवळपास १०० किमी अंतराच्या रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली आहे. यात अमळनेर ते निम, वावडे- जवखेडा- रणाइचे- जानवे, राज्यमार्ग ३९, राज्यमार्ग ६, मुडी ते लोण,निम ते भिलाली यासह इतर रस्त्याचा समावेश आहे. तसेच इतर भागात मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून नवीन रस्त्यांची कामे मंजूर असल्याने त्या भागातही लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे अभियंता महाजन यांनी सांगितले.
माध्यमांची दखल घेत वळणावरील झुडुपे केली साफ…
मारवड रस्त्यावरील क्रीडा संकुलाच्या जवळ वळणावर झुडुपे वाढल्याने घाण व कचरा टाकण्याचे प्रकार वाढले होते. त्याचा त्रास पायी फिरायला व व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांना होत होता. त्याबाबत वृत्तपत्रांनी बातमी प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबीने झुडुपे काढत साईडपट्टी साफ करण्यात आली. इतर भागातही वळणावर असणारी मोठी झुडुपे काढण्यात यावीत अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांनी केली आहे.




