
बहादरवाडी, खोकरपाट व सडावण ग्रामस्थांनी दाखवली भूतदया…
अमळनेर:- अज्ञात वाहनाच्या धडकेने ठार झालेल्या माकडाची अंत्ययात्राच नव्हे तर त्याचे उत्तरकार्य, केस दान आणि गावजेवण देऊन बहादरवाडी, खोकरपाट व सडावण गावांच्या ग्रामस्थांनी प्राण्याबद्दल भूतदया दाखवली आहे.

बहादरवाडी शिवारात २४ डिसेंबर रोजी एका माकडाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. अन हळूहळू गावकरी गोळा झाले त्यांच्यातील संवेदना जागृत झाल्या. सर्वांनी मिळून माकडाची अंत्ययात्रा काढण्याचे ठरवले. बाळू गणसिंग पाटील आग्या झाले आणि उपेंद्रसिंग पाटील, हेमंत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निलेश पाटील हे चार खांदेकरी झाले. विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर हिंदू संस्कृतीप्रमाणे दशक्रिया, उत्तरकार्य करण्याचा निर्णय झाला. लोकसहभागातून गावजेवण करण्याचा निर्णय झाला. अनेक ग्रामस्थांनी केस देण्याची तयारी दर्शवली. बहादरवाडी, खोकरपाट आणि सडावण या गावच्या सरपंच रामकृष्ण पाटील, उपसरपंच रमेश पाटील, संजय पाटील, रवींद्र पाटील, देविदास पाटील, शांताराम पाटील, जयविर पाटील, रणजित पाटील, किरण पाटील, दिपक पाटील, निंबा पाटील, पोलीस पाटील पांडुरंग पाटील, भरतसिंग पाटील, गोकुळ पाटील, प्रभाकर पाटील, रामकृष्ण पाटील यांनी सहकार्य केले. दोन्ही गावांनी दहा दिवस सुतक पाळले होते. विधीप्रमाणे गावकऱ्यांनी नदीवर जाऊन केस दान केले. गंधमुक्ती कार्यक्रम माकडाचा फोटो ठेवून करण्यात आला. उत्तरकार्याला बहादरवाडी व खोकरपाट गावे सुतकातून मुक्त झाले. ग्रामस्थांच्या भुतदयेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.




