
हयातीचा दाखला जमा करण्यासाठी लाभार्थ्यांची गर्दी…
अमळनेर:- केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वेळेवर जमा व्हावे यासाठी विशेष अर्थसहाय्य योजनेचा लाभार्थ्यांकडून हयातीचा दाखला तहसील कार्यालयात जमा करण्यात येत आहे. त्यासाठी तहसील कार्यालयातील या शाखांबाहेर ज्येष्ठ नागरीकांच्या रांगा लागल्या आहेत.

अमळनेर तालुक्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेचे 7 हजार 105, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेचे 1 हजार 26, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजनेचे 21 तर संजय गांधी योजनेचे 5 हजार 609, तर श्रावणबाळ योजनेचे 10 हजार चारशे 85 असे एकूण 24 हजार दोनशे 46 लाभार्थी आहेत. राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग व शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्तींना मदत व्हावी तसेच गोरगरीब जनतेला आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविल्या जातात. सदर लाभार्थ्यांना मिळणारे हे अनुदान थेट ऑनलाइन लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते. मात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरील तांत्रिक अडचणीमुळे अनुदान मिळण्यास उशीर होतो. तो होऊ नये म्हणून लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याचे ईकेवायसी करून घ्यावे. तसेच आपल्या बँक खात्याशी आपले आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा त्यानंतरच अपडेट पासबुक आधारकार्ड सदर शाखेत जमा करा. जर हे करण्यासाठी सदर लाभार्थी सक्षम नसतील म्हणजे वयोवृद्ध असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी किंवा शेजाऱ्यांनी या ज्येष्ठांना मदत करावी जेणेकरून लाभार्थी या योजनांच्या अनुदानपासून वंचित राहणार नाहीत, असे आवाहन इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेतील अव्वल कारकून किशोर उपचार्य यांनी केले आहे.




